Quantcast
Channel: श्रध्दा-संस्कृती – Prahaar.in
Viewing all articles
Browse latest Browse all 1081

महाराष्ट्राचा समाजवादी देव

$
0
0
pandharpur

चंद्रभागा खळाळून वाहते आहे.. ही चंद्रभागा चाळीस वर्षापूर्वी अडवली गेली आणि त्यातून ‘उजनी’ धरण तयार झाले. उजनी धरणाच्या उद्घाटनाला यशवंतराव चव्हाण जेव्हा निघाले तेव्हा ते धरणाच्या बांधावर जाण्यापूर्वी पंढरपूरला विठुरायाच्या पायाशी आले. त्यांनी पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवले. सद्गदीत झालेल्या यशवंतरावांनी विठुरायाची माफी मागितली. ‘तुझी चंद्रभाग मी आज अडवली आहे.

pandharpur

मला माफ कर.. तुझ्या भक्तांना स्नानाला पाणी मिळणार नाही. पण आषाढी कार्तिकीला हरिनामाचा गजर करीत, ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात महाराष्ट्राचा जो गरीब शेतकरी तुझ्या दर्शनाला आसुसलेला आहे त्याच्यासाठीच मी चंद्रभागा अडवली आहे. विठुराया, तुझ्या चंद्रभागेचे पाणी माझ्या शेतक-याच्या शेताशेतात जाईल. मनगटासारखी कणसे येतील आणि त्या कणसातील जोंधळयाच्या प्रत्येक दाण्यात माझ्या शेतक-याला महाराष्ट्राचा हा समाजवादी देव पाहता येईल..’

यशवंतरावांचे डोळे अश्रूंनी भरले होते. खिशातला रूमाल काढून त्यांनी आपल्या भावनाप्रधान मनाला समजावले आणि ते उजनीच्या उद्घाटनाला आले. तिथेही त्यांनी हा विचार सांगितला आणि महाराष्ट्रचा समाजवादी देव कष्टकरी जनतेसाठी सदैव कटेवर हात ठेवून उभा आहे. यशवंतरावांच्या भाषणाने हजारो शेतकरी गद्गदून गेले होते. तोच महाराष्ट्रातील हा १८ पगड जातीचा भोळा-भाबडा भाविक आज चंद्रभागेच्या तीरी विठुरायाच्या पायाशी लोळण घेत आहे. याच विठूला साक्षी ठेवून ही मांदियाळी आज तिथे जमलेली आहे.

इथे जात-पात विचारली जात नाही. टाळ, मृदंगांचा गजर हेच इथे जिव्हाळयाचे माध्यम आहे. कधी एकदा त्या विठुरायाचे दर्शन घेईन यासाठी आसुसलेला हा भक्त कष्टाची पर्वा करीत नाही. पाऊस-पाण्याची चर्चा करीत नाही. गेल्यावर्षीच्या आषाढीला कडक उन्हे होती. या वर्षी चंद्रभागा ओसंडून वाहत आहे. ऊन असो, पाऊस असो या भक्ताची पाऊले आज पंढरपुराकडे वळतात, गळयात रुद्राक्षांची माळ आणि मुखात ग्यानबा-तुकारामाचा गजर.. अध्र्या किंवा एक सेकंदाच्या दर्शनाने पुढचे वर्षभर जगायची शक्ती घेऊन हा भक्त द्वादशीला तिथून परतणार आहे. गेले सात आठवडे हा भक्त दर्शनाच्या आशेने कुठून कुठून चालत निघाला आहे. कुठे देहू, कुठे आळंदी..

खांद्यावर पालखी घेऊन हे रिंगण शेकडो वर्षे?चालत आहे. एक थकला की दुसरा.. दुसरा थकला की तिस-याच्या खांद्यावर पालखी..शरीर थकले तरी भक्तीने भरलेले मन थकत नाही. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ग्यानबा-तुकारामाचा हा गजर एक विलक्षण गजर आहे. ही संतांची मांदियाळी आहे.

इथे गोरा-सावता-नरहरी-रोहिदास-सजनकसाई-जनी असे विविध जातीपातीतील संत तत्त्वज्ञानाची भाषा बोलू लागलेले आहेत आणि विठुराया त्यांच्यासाठी धावून आला आहे. माता-पित्याची सेवा करणारा पुंडलिक.. त्याच्या भेटीला आलेल्या विठुरायाला त्याने विटेवर उभे करून ठेवले आहे. आपल्या भक्ताची मातृ-पितृ सेवा पाहून हा विठुराया अगदी शांतपणे कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे.

ज्ञानेश्वर १२व्या शतकातील.. तुकाराम १६व्या शतकातील.. मध्ये ४०० वर्षाचे अंतर आहे. जगातील कोणत्याही देशातील दोन महान तत्त्ववेत्त्यांची अशी जोडी कुठेच सापडणार नाही. ४०० वर्षाचा फरक असून, ज्ञानदेवात तुकोबा आणि तुकोबात ज्ञानदेव एवढे एकजीव झाले आहेत की, दर्शन विठूचे आणि गजर ग्यानबा-तुकारामाचा! द्वैताने अद्वैतावर केलेली ही मात आहे आणि विठुरायाच्या पायाशी येऊन हे द्वैत थांबलेले आहे.

परमेश्वराच्या दर्शनाचे समाधान किती असू शकते याचा प्रत्यय म्हणजे वारी आहे. वारी हे एक व्रत आहे. तुळशीची माळ गंमत म्हणून गळयात घातली जात नाही. तो अलंकार नाही. ती माळ तुटली तर नवी माळ सात दिवस ज्ञानेश्वरीवर ठेवून कडक सात दिवसांचा उपवास केल्यानंतर ती माळ गळयात घालण्याचा अधिकार त्या वारक-याला प्राप्त होतो. त्यामुळे वारी हे व्रत ठरले.

महाराष्ट्राचा हा वारकरी, माळकरी आणि टाळकरी या तिन्ही द्वैतांमधून एक अद्वैत निर्माण झाले आहे आणि ही अठरा पगड जातीची मांदियाळी चंद्रभागेत जातीभेद बुडवून हातात हात घालून विठूच्या जयजयकाराचे िरगण आज पंढरपुरात दाखल झाले आहे. भक्तीचे रसायन हे सर्वश्रेष्ठ रसायन आहे.

भक्तीने पर्वत हालतात. ती श्रद्धा आणि ती भक्ती हा महाराष्ट्राच्या भागवत धर्माचा पाया आहे. त्या पायावर ही भागवत धर्माची इमारत उभी आहे. गोरा कुंभार मडकी भाजता भाजता त्याला वाटले की, आपण मडकी भाजतो आहोत, पण आपल्या डोक्याचे मडके कच्चे की पक्के.. त्या ठिकाणी त्याला ज्ञान प्राप्त झाले. सावता माळी.. बागेतील तण उपटता उपटता तो बोलू लागला..

माझ्या मनातील अविचाराचे तण मी दूर केले आहेत का? तिथे त्याला आत्मज्ञान झालेले आहे. सेना नाभिक होता.. लोकांची डोकी साफ करताना आपल्या डोक्यातील अविचारांचा मळ आपण दूर केला आहे का.. अशी आत्मज्ञानाची भाषा तो बालू लागला. ही सगळी मंडळी आत्मज्ञानातून संत झाली आणि ते त्यांचे आत्मज्ञान हे तत्त्वज्ञान बनले. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम हे संतश्रेष्ठ शिरोमणी आहेत आणि बाकी सर्व?अठरा पगड जातीतील संत महाराष्ट्राच्या आध्यात्मिक विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्या सर्व?संतांना आजच्या आषाढीला वंदन..

आजच्या आषाढीच्या दिवशी उपवास करायचा म्हणजे त्या महाराष्ट्राच्या समाजवादी देवाला शरण जाऊन महाराष्ट्रातील जाती-भेद गाडून अखंड महाराष्ट्राला समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी या विठुरायाच्या चरणी लीन व्हायचे.
बोला पुंडलिका वरदे.. हरि विठ्ठल..
- मधुकर भावे

विठुरायाची भजने

पंढरपूरच्या विठुरायाशी सामान्य भाविकाची जेवढी जवळीक आहे एवढी जवळीक अन्य कोणत्याही देवाजवळ नाही.. सामान्यातील सामान्य माणसाला ‘विठुराया’ हा आपल्या घरातील वाटतो आणि त्या भक्ताचा त्याच्याशी थेट संवाद होतो. ‘विठू’, ‘विठ्ठल’, ‘विठोबा’ अशा अनेक नावांची योजना ज्या भजनांमध्ये आहे अशी असंख्य भजने आज खेडयापाडय़ांत टाळ-मृदंगाच्या घोषात म्हटली जात असतात. त्या भजनांचे हे काही चरण..!

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला।
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला॥

विठू माऊली तू माऊली जगाची

चंद्रभागेला आला लोंढा
पाणी लागले वडाला
विठ्ठल बोले रखुमाईला,
पुंडलिक आपला बुडाला..

विठोबा पाहुनी तुझे रूप..
हरली माझी तहान-भूक

सुपातल्या खारका..
पाण्यातली द्वारका
विठोबासारखा देव नाही..

ये गं, ये गं विठाबाई,
माझे पंढरीचे आई..

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल

जय जय विठ्ठल..
जय हरि विठ्ठल..


Viewing all articles
Browse latest Browse all 1081

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>