Quantcast
Channel: श्रध्दा-संस्कृती – Prahaar.in
Viewing all articles
Browse latest Browse all 1081

आम्हा विठ्ठल एकचि देव!

$
0
0
sant namdev copy

आज आषाढी एकादशी. विठ्ठलाच्या भक्तीत न्हाहून निघालेले संत कायमच विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरची वारी करीत असत. आजही त्यांची ही वारी खंडित झाली नाही. ती अविरत सुरूच आहे. संत चोखामेळा, संत सावता महाराज, संत नामदेव, संत तुकाराम आणि संत जनाबाई अशा संतांसाठी विठ्ठल हाच सखा, सोबती सर्व काही होता अशा संतांची ही माहिती.

sant tukaramसंत तुकाराम

अखंड कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रह्मभूत झाली असे साक्षात्कारी ‘सत्पुरुष’; जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे व जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे ‘जगत्गुरू’ आणि भागवत धर्माचा कळस झालेले ‘संतश्रेष्ठ’ संत म्हणजे तुकाराम. त्यांचं संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले(मोरे).

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग तुकयाचा’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. त्यांची भावकविता म्हणजेच अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच, तसंच खेडय़ातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत.

आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे. त्यांच्या अभंगांत परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा॥’
असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं॥’ असे म्हणत,

शब्दांवर प्रभुत्व राखत तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. जातिभेदावर टीका केली, विठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, आध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्यप्रतिभा झेपावलेली दिसते. सांप्रदायिक अभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली. भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले.

एका शुचिष्मंत घराण्यात पुणे जिल्हय़ातील देहू येथे शके १५३० मध्ये (इ. स. १६०८) वसंत पंचमी (माघ शु. पंचमी) या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इ. स. २००८ या वर्षी त्यांच्या जन्माला ४०० वष्रे पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होय. सावजी हा त्यांचा मोठा तर कान्होबा धाकटा भाऊ होता.

मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. १७-१८ वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला.

संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे-ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, परब्रह्मस्वरूप ‘विठ्ठल’ त्यांना भेटला.

भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। वृत्ती स्थिरावली परब्रह्मी॥
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। पिडू जे लागले सकळीक॥
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार॥

या शब्दांत त्यांच्या तपश्चर्येचे वर्णन केलेले आढळते. सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करणे हेच संत तुकारामांचे जीवन होते. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत॥’ या वचनावरून पंढरपूरचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते.

वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्टय़ होय. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रकट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून विठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन; कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोटय़ा साधूंवर टीका; विशुद्ध पारमाíथक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो.

जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले॥
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥
संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश॥
तुका म्हणे तोची संत। सोशी जगाचे आघात॥
महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती॥
ऐसी कळवळय़ाची जाति। करी लाभाविण प्रीती॥
सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे॥
शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी॥

तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत, की असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या ४१ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी सुमारे ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागवला.

असे म्हणत ते फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) ब्रह्मलीन झाले. संत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.

जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी॥
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा॥


janabaiसंत जनाबाई

‘‘जनीचे अभंग लिहीत नारायण। करीत श्रवण साधुसंत॥
धन्य तेचि जनी, धन्य तिची भक्ती। नामदेव स्तुती करीतसे॥’’

संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसांत लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेडयापाडयातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्हयातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई या पंढरपूरचे वारकरी ‘दमा’ आणि भगवत्भक्त स्त्री ‘करुंड’ या दाम्पत्याची मुलगी होय.

आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयता नियमित पंढरीची वारी करायचे. तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशेट शिंपी यांच्या पदरात टाकले, तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा॥’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्वरू।’ असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. गव-या-शेण्या वेचतांना, घरातील इतर कामे करताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथेत मुद्रित केले आहेत. या शिवाय ‘कृष्णजन्म’, ‘थाळीपाक’, ‘प्रल्हादचरित्र’, ‘बालक्रीडा’, ‘हरिश्चंद्राख्यान’ अशा आख्यानरचना त्यांच्या नावावर आहेत. संत जनाबाईंच्या ‘थाळीपाक’ व ‘द्रौपदी स्वयंवर’ या भावमधुर आख्यानांनी महाकवी मुक्तेश्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ती मिळाली.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्वकिार झाल्या. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्यांचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो.

वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे त्यांच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात.

तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानकाका, संत गोरोबा, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा, सदगुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढयांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत.
संत जनाबाई क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या (इ. स. १३५०).


savtamaliसंत सावता महाराज

कर्मयोग अतिशय साध्या सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे, थोर संत म्हणजे संत सावता महाराज. कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत सावता महाराज आहेत. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे.

विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कम्रे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. आध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली.

धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाहय़ अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे. हा विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करतानाही ईश्वर भेटतो.

‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग; मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’
असे म्हणणा-या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ही त्यांची प्रतिज्ञा होती.

‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’, ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’

या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.

अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे त्यांचे आजोबा. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय.

आजोबा अरण गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच. दोन मैलांवर नामदेव म्हणतात -

धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो॥
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी॥

संत सावता महाराज हे संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता याचा अर्थ सभ्यता, सावपणा असा होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता.

‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’असे ते एका अभंगात म्हणतात. महाराजांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली.


sant namdev copyसंत नामदेव

‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असे संत नामदेव प्रत्यक्ष विठ्ठलाच्या निकटवर्ती होते. वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली.

दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्हयातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म संवत्सर, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये काíतक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरीमध्ये गेले. लहानपणापासूनच विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरोबांकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याचप्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

संत नामदेवांची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी िहदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे साठ अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपित घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत ज्ञानेश्वरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले.

सर्व संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला.

प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शब्दकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. राजस्थानातील शीख बांधवांनीही यांची मंदिरे उभारलेली आहेत. ‘संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.


Saintschokha melaसंत चोखामेळा

‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती॥’

खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत. संत चोखोबा हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत! संत शिरोमणी नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे ते होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते.

गावगाडयातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय़, वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले. त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३ शतकात उदयाला आली म्हणून संत चोखोबा म्हणतात,

‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा॥’

असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील आध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला. संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो.

संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या.

भगवंतांच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणा-या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखोबांचे सुमारे ३५० अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंत भट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.

‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद।
बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध॥’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार।
बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्टयासाठी आलो॥’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता॥’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा॥
चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा॥’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’

हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. चोखोबांच्या रचनांत भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि ‘वेदनेचा सूर’ ही लागलेला दिसतो, जो आजही आपले अंत:करण हेलावून टाकतो.

‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे॥’
‘जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदिअंती॥’
‘आदि अंति अवघा, विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे।
चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळापरते आहे कोण॥’
या रचनांतून उपरोक्त उल्लेख केलेल्या भावभावना दिसतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी॥
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर॥’

या वैशिष्टय़पूर्ण रचनेत चोखोबा ज्ञानेश्वर माउलींबद्दल ‘प्राणसखा’ हा अतिशय सुंदर शब्द सहजगत्या योजून जातात. यातून तेराव्या शतकातील या ‘संतकवी’चे साहित्यगुणही दिसून येतात. त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वाचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे.

संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग-रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला ‘विठू पाटलाचा बलुतेदार’, म्हणून समजत.

संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना उपेक्षित बांधवाच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान-हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले. गावगाडयातील गावकुसाचे काम चालू असताना एका दुर्दैवी अपघातात त्यांचा अंत झाला, असे उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात आढळतात. संत नामदेवांनी त्यांच्या सर्व अस्थी गोळा केल्या. त्यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद त्यांनी ऐकला.

संत नामदेवांची महाद्वारात जिथे पायरी आहे, त्याच्या बाजूला संत चोखोबांची समाधी पंढरपूरमध्ये आहे. संत बंका (चोखोबांचे मेव्हणे) व संत नामदेव यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत -

‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ॥
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तीचा आगर॥
चोखा प्रेमाची माऊली। चोखा कृपेची साऊली॥
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण॥’
(- संत बंका)
‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा॥
काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती। मोही आलो व्यक्ती तयासाठी॥
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी॥
नामदेवे अस्थी आणील्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर॥
(-संत नामदेव)


Viewing all articles
Browse latest Browse all 1081


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>