
मागील भागात आपण गुरुलीलामृत ग्रथातील पहिल्या अध्यायातील १७०व्या ओवीचा विचार करत होतो. ओवीचा अर्थ एका भागात संपविणे योग्य होणार नाही. म्हणून त्या ओवीचे सूत्र आपण पुढे नेऊयात.
मागील भागात आपण गुरुलीलामृत ग्रथातील पहिल्या अध्यायातील १७०व्या ओवीचा विचार करत होतो. ओवीचा अर्थ एका भागात संपविणे योग्य होणार नाही. म्हणून त्या ओवीचे सूत्र आपण पुढे नेऊयात.
माणसाचा आचार, विचार, उच्चार एक असला पाहिजे तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो हे सूत्र आहे. परंतु, दुर्दैवाने आपण तसे वागत नाही. त्यामुळे आपणच अनर्थ ओढावून घेतो. अधर्माने वागायला लागतो. रामायणात एक दृष्टांत आला आहे. प्रभू रामचंद्र, माता सीता आणि बंधूश्रेष्ठ लक्ष्मण हे तिघे पंचवटीत होते. त्यावेळी सीतामाईंना सोनेरी हरीण दृष्टीस पडले. त्याबरोबर त्यांचा विचार सुरू झाला. विचाराने मनाचा ताबा घेतला. मन द्विधा अवस्थेत गेले. एक मन सोनेरी हरणच्या कातडय़ाची चोळी बनविण्याची अपेक्षा करीत होते. तर दुसरे मन ते धर्माच्या विरुद्ध आहे.
तिची अपेक्षा करू नकोस असे बजावित होते. शेवटी पहिल्या मनाचाच विजय झाला. वाईट ते अधिक झाले. सीतामाईंचा विचार बिघडला. विचार बिघडल्याबरोबर त्यांनी आपल्या पतीदेवांना हुकूम केला आणि त्यांना म्हणजे प्रभू रामचंद्रांना पत्नी इच्छापूर्ती धर्माची आठवण करून दिली. विचार प्रगल्भ झाल्याबरोबर त्याचा उच्चार केला. विचार बिघडला आणि त्या बिघडलेल्या विचाराचा उच्चार केला, त्यामुळे राम यांना हरीण मारण्यासाठी जावे लागले. त्याचा परिणाम संकट ओढवून घेण्यात झाला. म्हणजे आचरण झाले. पहिल्यांदा विचार बिघडला, त्यामुळे उच्चार बाहेर पडला. हरणाच्या पाठीमागे पतीला कामाला लावले. त्यामुळे आचारही बिघडला. हे सगळं कशामुळे घडले तर दृढनिश्चयी नसल्यामुळे घडले. सीतामाईंच्या दोन डोळय़ांनी एकरूपता न दाखविल्याने मनाची द्वीधा अवस्था कायम राहिली. दोन मनांनी दोन वेगळे रस्ते दाखविले. त्यात चुकीच्या विचारांचा प्रभाव अधिक झाला. त्यामुळे द्वय अधरपुटींना म्हणजेच ओठांनी चुकीचे उच्चारण केले हा झाला दृष्टांत.
श्रोतेहो! आपली सर्वाची अशी अवस्था पावलोपावली होते की नाही? श्री स्वामी समर्थाना भक्तांची अशी अवस्था होऊ नये म्हणून सतत काळजी असायची. त्याकरिता ग्रंथ अभ्यासाची गरज आहे. इथे लेख विस्तारामुळे देत नाही. परंतु आपण सामान्य माणसं नेहमी द्वीधा अवस्थेत असतो. एखादे काम एकाला सांगितले तर त्याच्यावर आपला भरवसा राहात नाही. मग त्यासाठी पुन्हा वेगवेगळे मार्ग अवलंबतो. उदारपणे मन एकावर विसंबून राहात नाही. समजा आपले उपास्य दैवत आंबाबाई आहे. आपण काय करतो? मंगळवार करतो. देवीची पूजा बांधतो. नवस बोलतो. मग देवी बरेच दिवस काम करीत नाही. मग कुणीतरी सांगतं तुम्ही सोमवार करून महादेवाची उपासना करा. तरीही काम होत नाही. मग दत्तप्रभूंना सांगा, गुरुवार करा. मग काम होईल. परंतु नाही. शनिवार मारुतीचा वार.शनिमहाराजांची पीडा आहे. त्यामुळे काम होत नाही. मग शनिमहाराज मारुतीरायाच्या ऐकण्यात आहे. सध्या टी. व्ही.वर जय मल्हार ही सीरियल चालू आहे. बानूची सगळी कामे खंडेराय करतात. आपलेही करतील. खंडेरायांचा वार रविवार आहे. चला रविवार करू. तरीही काम होत नाही. मग शुक्रवारही आईचाच आहे. शुक्रवारही करूया. आता राहता राहिला बुधवार. पांडुरंगाने तर सगळय़ा संतांचे घर चालवले आहे. तो गरिबांचा देव आहे.
तो नक्की आपलं ऐकेल! त्याचीही बुधवारी पूजा करू! स्वामी समर्थ चरित्राचे निर्माते याला भक्ती मानत नाहीत. कारण श्री महाराज स्वत:च सांगत, ‘बाबांनो! वडाच्या पारंब्या धरून राहा!’ याचा अर्थ काय? तर वटवृक्षाचे एकदा बारकाईने निरीक्षण करा. वडाच्या झाडाच्या पारंब्या वरून खाली येतात. त्या अगदी सरळ रेषेत खाली येतात. जमिनीत पुन्हा रुजतात. त्याच ठिकाणी वाढतात. त्यातून पुन्हा नवीन वृक्ष जन्मास येतो. वटवृक्ष विशाल असतो. तो सतत विस्तारतो. दीर्घायुषी असतो. अनेकांच्या उपयोगी येतो. औषधी असतो. घनदाट सावली देतो. स्थितप्रज्ञ असतो. म्हणून त्याला समाधी वृक्षही म्हणतात. वर्षानुवष्रे समाधी लावून बसल्यासारखा भासतो. तो कितीही उंच वाढला, विस्तारला तरीही तो पुन्हा जमिनीकडे म्हणजेच आपल्या मुळाकडे आईकडेच झेपावतो. आईला कधीच विसरत नाही. आपले मूळ कधीच सोडत नाही. म्हणून महाराज त्याचे उदाहरण देतात.
एक निश्चयी, दृढ निश्चयी, आपल्या मूळ उद्दिष्टाला धरून राहण्याचा, कितीही संकटे आली तरीही आपल्या आराध्य देवतेला, आपल्य सद्गुरू वचनाला, सत्य संकल्पाला न सोडण्याचा सल्ला श्री स्वामी समर्थ महाराज देतात. द्वीधा मन:स्थिती न ठेवता एकाच दृढ निश्चयाला धरून राहा असा त्या उपदेशाचा अर्थ आहे.
। मना सत्यसंकल्प जीवी धरावा।।
९७६५४१०२९५
कठीण प्रसंगात स्वामींनीच तारले
बेताची परिस्थिती आणि संसारात होरपळले असतानाच स्वामींच्या चरणी माथा टेकविण्याचे भाग्य मला मिळाले आणि माझ्या संसाराची विस्कटलेली घडी आज सुरळीत झाली. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले; पण मी स्वामींच्या नामाचा घेतलेला ध्यास हा आजही सोडलेला नाही. रोज स्वामींचे अकराशे वेळा जप आणि नामस्मरण या जोरावर आज मी माझ्या आयुष्यात समाधान पावले आहे. १९९४ पासून मी स्वामींची भक्ती करत आहे. मला जळी, स्थळी स्वामींचा अनुभव आला. जेव्हा जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग आले तेव्हा तेव्हा स्वामींनीच आम्हाला तारले आहे.
माझा मुलगा लहान असताना त्याला रिक्षातून दवाखान्यात नेत असताना दहा वर्षापूर्वी कांजूरला आमची रिक्षा कलंडली आणि अपघात झाला. माझ्या डोक्याला जबर मार लागला. अशा वेळी कुणीही पुढे सरसावले नाही. मात्र एक व्यक्ती पुढे सरसावली आणि त्यांनी प्रथम माझ्या मुलाला उचलून मला तात्काळ हॉस्पिटलला हलवले. त्या व्यक्तीमुळे माझ्यावर वेळीच उपचार झाले आणि माझे प्राण वाचले. ती व्यक्ती मला स्वामींच्या रूपानेच भेटली. मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाते. रोज जप करणे आणि स्वामींच्या मठात जाणे हा माझा गेल्या काही वर्षाचा नेम आहे आणि त्यात कधीही खंड पडलेला नाही. स्वामीच आमचे तारणहार आहेत. त्या अपघातात डोळय़ाला बसलेल्या मारामुळे अलीकडे माझी दृष्टीही कमी आली होती. पण डॉक्टरांनी हे ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी होणार नाही असे सांगितले होते. पण स्वामींच्या कृपेने आज तेच ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी झाले आहे.
सुरुवातीला परिस्थितीमुळे खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अक्षरश: यामध्ये मी पोळून गेले होते. आजारपण, दोन मुलांचं शिक्षण सांभाळून संसाराचा डोलारा सावरताना अनेक यातना झाल्या. यावेळी अनेक अडचणी आल्या; पण नित्यनेमाने स्वामींची केलेली भक्ती आज फळास आली आहे. माझा मोठा मुलगा आज चांगल्या नोकरीस आहे तर दुसरा मुलगा सी. ए. करत आहे. स्वामींनी कठीण प्रसंगात दिलेली साथ ही कधीही न विसरण्याजोगी आहे. आज स्वामींमुळे मला चांगले दिवस पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे स्वामींच्या भक्तीमध्ये कधीही खंड पडलेला नाही. मी भांडुपला राहते. पण दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाण्याचा माझा नेमही कधी चुकलेला नाही. दादर किंवा भांडुपमध्ये स्वामींच्या मठामध्ये मी नित्यनेमाने स्वामींच्या दर्शनासाठी जात आहे. कठीण प्रसंगातून आज स्वामींनी चांगले दिवस दाखविल्यामुळे माझ्या पतींचाही आज स्वामींवर पूर्ण विश्वास असून तेही वेळ मिळेल तेव्हा दादर येथे मठामध्ये जातात. त्यामुळे स्वामीच आमचे श्वास आणि ध्यास आहेत.
श्री स्वामी समर्थ स्तोत्र
आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनातील निबीड अरण्यात, एकांतस्थळी एक महात्मा काष्ठ समाधीत निमग्न होता. शरीरावर लता, वेली, झुडपे, वारूळही उगवू लागली. एके दिवशी एका लाकूडतोडय़ाने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून त्या समाधीस्त योग्याच्या मांडीवर बसला. त्यापाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूडतोडय़ा भयभीत झाला. इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले.
लाकूडतोडय़ास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी तेथून बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला, याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो. श्रीशैल्य पर्वतराजीतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थानी कोणकोणत्या स्थानांना भेटी दिल्या, हे इतिहासाला ज्ञात नाही. परंतु स्वामींच्या कथनातून वेळोवेळी जी माहिती झाली त्यातून काही आडाखे बांधता येतात.
ते सर्वप्रथम काशीक्षेत्री आले. त्यानंतर आसेतुहिमाचल विविध तीर्थक्षेत्रांतून त्यांनी भ्रमण केले. ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे करीत अक्कलकोटला आले. स्वामींनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घकाळ वास्तव्य केले, म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते. चैत्र वद्य १३, मंगळवार, बहुधान्यनाम संवत्सर शके १८०० इ.स. १८७८ या दिवशी सायंकाळी चारच्या सुमाराला श्री स्वामी महाराज निजानंदी विलीन झाले. श्री स्वामींनी शिष्य श्री बाळप्पा महाराजांवर अनुग्रह केला. त्यांनी आपल्या चिन्मय पादुका व इतर प्रासादिक चिन्हे देऊन, अक्कलकोटला मठ स्थापन केले.
बाळप्पांना मंत्रदीक्षा देऊन त्यांना त्रयोदशाक्षरी महामूलमंत्राचा उपदेश केला. स्वामीभक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रेय गुरुपीठाची स्थापना केली. गुरू दत्तात्रेयांच्या परंपरेतील भगवान अवधूत दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती (गाणगापूर) आणि श्री स्वामी समर्थ अशी श्रेष्ठ गुरू परंपरा अवधूत पीठास लाभली आहे. महान गुरू परंपरेतील
श्री स्वामी समर्थाच्या नंतरचे चौथे उत्तराधिकारी म्हणून अक्कलकोट रेल्वे स्टेशन रस्त्यावरील शिवपुरी आश्रमाचे सत्यधर्मप्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज १९३८ मध्ये पीठारूढ झाले.
श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे. त्यांची आराधना करावी. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मंत्रस्वरूप मानून अंत:करणाने ग्रहण करावे. अशी गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते. वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये. निरंतर केवळ विषय चिंतन करणा-या स्त्री अगर पुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल. दुष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर तुम्हीही दुष्ट व्हाल. एक ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे अशी भावना करा, जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील. परावलंबी नसावे, स्वत: उद्योग करावा व खावे. गांजा केव्हाही ओढू नये, त्याने अपाय होतो. आपल्या धर्माप्रमाणेच (कर्तव्यकर्मानुसार) वागावे, त्यानेच सर्वत्र विजय प्राप्त होतो.
ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वत: कोणतीही ज्ञानपिपासा दाखविल्याशिवाय गुरू आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. साधना करताना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात, त्यांचा चमत्कार दाखविण्याच्या कामी उपयोग करणे गर आहे. परमार्थज्ञानाचा उपयोग स्वचरितार्थाचे साधन म्हणून करणे हे अयोग्य आहे. ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणा-या सर्व धर्म मतांचे व सर्व पंथांचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळे सर्व धर्म मते व पंथ वंदनीय आहेत. या जगात प्राप्त होणारी सुख-दु:खे, परमात्म्याच्या इच्छेने घडतात असे मानून त्यांचा स्वीकार करावा.
मूर्तिपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी, केवळ मूर्तिपूजाच करीत राहणे, हेच मनुष्यप्राण्याचे कर्तव्य नाही. परमात्मप्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे.